ऐकलंत का… सरकार देणार तब्बल ३० कोटी रुपये! केंद्र सरकारच्या ‘गोवर्धन योजने’चे नवे नियम जारी…

मुंबई : सरकारकडून जनसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये आता गोवर्धन योजना महत्त्वाची ठरू शकते. या योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पांना तब्बल ३० कोटी रुपयांपर्यंत भांडवली मदत मिळू शकते.
त्यामुळे कचऱ्यापासून बायोगॅस किंवा कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्लांट उभारण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. नेमकी काय आहे ही योजना आणि त्यातून कोणते लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया.

काय आहे गोवर्धन योजना?
गोवर्धन म्हणजेच Galvanising Organic Bio-Agro Resources Dhan योजना. या योजनेअंतर्गत शेण, शेतीतील अवशेष, अन्नकचरा आणि इतर सेंद्रिय कचऱ्यापासून बायोगॅस, CBG आणि सेंद्रिय खत तयार करणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाते.


सरकारने आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीसाठी गोवर्धन योजनेचा नवीन आराखडा लागू केला आहे. या माध्यमातून CBG प्रकल्पांना आर्थिक मदत देण्यासोबतच गॅसच्या खरेदीची हमी आणि निश्चित दराचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
३० कोटी रुपयांपर्यंत भांडवली मदत
पात्र CBG प्रकल्पांना ३० कोटी रुपयांपर्यंत भांडवली मदत मिळू शकते.
नवीन ग्रीनफिल्ड CBG प्रकल्पांसाठी पात्र क्षमतेच्या प्रत्येक टीपीडीमागे १.२५ कोटी रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.
ब्राऊनफिल्ड प्रकल्पांना अतिरिक्त क्षमतेसाठी ग्रीनफिल्ड दराच्या ५० टक्क्यांपर्यंत मदत मिळू शकते.
विद्यमान बायोगॅस प्लांटचे CBG उत्पादनासाठी अपग्रेडेशन केल्यास प्रत्येक टीपीडीमागे ०.६० कोटी रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.
फीडस्टॉक संकलन आणि सेंद्रिय खत निर्मितीशी संबंधित यंत्रसामग्रीसाठी पात्र खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत मदत मिळू शकते. मात्र, ही मदत प्रत्येक टीपीडीमागे ०.७५ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित असेल.
CBG खरेदीची हमी आणि निश्चित दर
नवीन योजनेअंतर्गत पात्र CBG उत्पादकांना विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या CBGपैकी १०० टक्क्यांपर्यंत गॅसच्या हमी खरेदीचा पर्याय निवडता येऊ शकतो.
तसेच, ९५ टक्के मिथेन प्रमाण असलेल्या CBGसाठी अंदाजे ९८ रुपये प्रति किलोग्रॅम असा दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर ३१ मार्च २०३६ पर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासोबतच CBG आणि सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना बाजारपेठ आणि उत्पन्नाच्या संधींबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.