महाराष्ट्रात मोठी खळबळ! गरबा खेळण्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर बोली लागल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : नवरात्री हा भारतातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवी दुर्गेची उपासना केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा आणि डांडियाचे विशेष आयोजन केले जाते.
रंगीबेरंगी पोशाख, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक गरबा हे नवरात्रीचे आकर्षण असते. गरब्यामध्ये महिला आणि पुरुष एकत्र येऊन वर्तुळात नृत्य करतात. भक्ती, आनंद आणि एकतेचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. मात्र, याच पारंपरिक उत्सवाच्या आयोजनावरून आता एका वेगळ्याच प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रात गरबा खेळण्यासाठी मुलींना भाडेतत्त्वावर बोलावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुलींना १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत पैसे देऊन गरबा कार्यक्रमांसाठी बोलावले जात असल्याच्या बातम्या समोर आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकाराला संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे.


संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता ॲड. संतोष शिंदे यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली. ते म्हणाले, “महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली देण्याचा हा गोरखधंदा संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही.”
“गरबा डान्स करण्यासाठी मुला-मुलींची १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत भाड्याने बोली लागत असेल, तर असे कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” असा इशाराही शिंदे यांनी दिला.
शिंदे यांनी पुढे म्हटले की, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना सण-उत्सवाचे दिवस सुरू आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक उत्सव चुकीच्या पद्धतीने व्यावसायिक स्वरूप देणाऱ्या प्रकारांमुळे बदनाम होऊ नयेत, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांचा व्यावसायिक स्वार्थासाठी गैरवापर किंवा विकृतीकरण होऊ नये, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली असून नवरात्रीदरम्यान आयोजित होणाऱ्या अशा कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे. गरब्याची पारंपरिक सांस्कृतिक ओळख आणि उत्सवाचे स्वरूप जपण्यासाठी आयोजकांनीही नियमांचे पालन करावे, अशी भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली आहे.