एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, माझ्याआधीचे अधिकारी…


पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्या धडाकेबाज कारवायांची चर्चा सुरू झाली आहे. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत तुकाराम मुंढे हे कडक आणि परिणामकारक कारवाईसाठी ओळखले जातात.

मुंढे यांनी एफडीएची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्याचवेळी, “मुंढेंच्या आधीचे अधिकारी काम करत नव्हते का?” असा सवालही उपस्थित होऊ लागला. याबाबत तुकाराम मुंढे यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत संयमित भूमिका घेत आधीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

तुकाराम मुंढे म्हणाले की, माझ्याआधीच्या अधिकाऱ्यांनी काम केले नाही, असे मुळीच म्हणता येणार नाही. त्यांनीही सिस्टीम उभी केली आहे आणि कारवाया केल्या आहेत. म्हणूनच आज आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही कुठेही व्हॅक्यूममध्ये (पोकळीत) जाऊन काम करत नाही.

कारवाईच्या पद्धतीतील फरकाबाबत बोलताना मुंढे यांनी कायद्यातील बदलाकडे लक्ष वेधले. प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे प्रमाण, वेग आणि प्रभाव कमी-जास्त असू शकतो. पूर्वी भेसळ प्रतिबंधक कायदा लागू होता, तर आता अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार काम केले जाते. त्यामुळे काळानुसार प्रशासनाची कार्यपद्धती आणि दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“पूर्वी भेसळ प्रतिबंधक कायदा होता. आता आपण अन्न सुरक्षा आणि मानकांच्या कायद्यांतर्गत काम करत आहोत. त्यामुळे त्यानुसार रि-ओरिएंटेशन आणि अप्रोच चेंज होणं गरजेचं होतं. हा जो फरक आहे, तो कायद्यातला फरक आहे,” असे मुंढे यांनी सांगितले.

तसेच, वेळेनुसार वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आधीच्या अधिकाऱ्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्थेवरच पुढील काम उभे करता येते. त्यामुळे पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा पाया महत्त्वाचा असून, त्याच आधारावर आता पुढील टप्प्यात काम करता येत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!