केतन अग्रवाल प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट! चेतन-सियाच्या कथित गुप्त विवाहाबाबत पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर


पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी अखेर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाहाचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

केतन अग्रवाल यांचे लग्न सिया गोयल हिच्यासोबत ठरले होते. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, सिया हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, असा पोलिसांचा आरोप आहे. घरच्यांना याबाबत सांगण्याऐवजी तिने केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे. या प्रकरणात केतनच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाहाचा मुद्दा समोर आला. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात दोघांनी लग्न केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार राजस्थानमध्येही चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीत लग्नाची अधिकृत नोंद किंवा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

तथापि, सियाच्या भांगेत सिंदूर आणि चेतनच्या गळ्यात फुलांचा हार असलेला फोटो आरोपींच्या मोबाईलमधून मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केल्याची माहिती आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक होती. डिसेंबरमध्ये दोघे मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. त्यानंतर सियाचे केतन अग्रवाल यांच्यासोबत लग्न ठरले आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा साखरपुडा झाला.

मात्र, पोलिसांच्या आरोपानुसार त्यानंतर केतनच्या हत्येचा कट रचण्यात आला. 31 मे रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलण्याची कल्पना पुढे आली, असा पोलिसांचा दावा आहे. 14 जून रोजी करण्यात आलेला प्रयत्न फसला. त्यानंतर 18 जून रोजी केतनला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

हत्येनंतर चेतन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या फुटेजमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचेही सांगण्यात येत आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, चेतन आणि सिया यांच्याकडून केतनला मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी केतन थोडक्यात बचावला. अखेर 18 जून रोजी त्याचा मृत्यू झाला.

केतन अग्रवाल यांच्या निधनाचा मोठा धक्का त्यांच्या आजोबांना बसला. या घटनेनंतर त्यांच्या आजोबांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केतनच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!