मुंबईला जाण्याआधी मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; सरकारसमोर नवा पेच, पुढे काय होणार?

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे १९ सप्टेंबर रोजी भगवे वादळ घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि उपोषण होणार आहे. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजपासून सलाईन आणि पाणी घेणे बंद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सरकारच्या भूमिकेला बांधील नाही’
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “आम्ही न्यायदेवतेच्या भूमिकेशी बांधील आहोत; मात्र सरकारच्या भूमिकेला बांधील नाही. सरकारच्या नियमांना आम्ही मानत नाही. फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठ्यांवर अन्याय केला आहे. राज्य अस्थिर करण्याचे काम फडणवीस आणि त्यांचे सरकार करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.


“गणेशोत्सवाच्या मिरवणुका होणार नाहीत का? देवेंद्र फडणवीस यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. आमचे वकील बांधव ठरवतील की पुढे काय करायचे. पीआयने जातीवाद करून गरीब मराठ्यांना त्रास देण्याचे ठरवले असावे. मनमानी पद्धतीने कायदा चालवणार असतील तर हा अन्याय आहे,” असेही जरांगे म्हणाले.
‘१५ तारखेला अंतरवाली सराटीतून निघणार’
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “मागील वर्षी हा कायदा नव्हता का? मग आता कसा आला? मुख्यमंत्र्यांना जातीत वाद लावायचे आहेत, हिंदू सणात राज्य दूषित करायचे आहे. त्यांनी मला गोळ्या घालून मारण्याचे षडयंत्र रचले आहे,” असा दावा त्यांनी केला.
“आम्ही १५ तारखेला इथून निघणार आणि १९ तारखेला मुंबईत जाणार. आजपासून मी सलाईन, पाणी सर्व बंद करणार. तुम्ही आमच्यावर अन्याय करणार, हे आम्हाला मान्य नाही. याला सर्वस्वी जबाबदार फडणवीस सरकार असणार,” असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
आझाद मैदान पोलिसांच्या पत्रात काय?
आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आझाद मैदान, मुंबई येथे प्रस्तावित आंदोलन, उपोषण व धरणे” याबाबतचा अर्ज १२ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका यासाठी २०२५ ची नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे आणि मिरवणुकांसाठी आझाद मैदानाचा निश्चित भाग निर्धारित करण्यात आला आहे.
मात्र, जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५ मधील नियम क्रमांक ११ (ड) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
याच नियमाचा आधार घेत आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे.