बारामती हादरलं! पणदरेत ३० वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात, चेहऱ्यावर हत्याराने वार अन् नंतर…

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील खोलीत ३० वर्षीय विवाहितेचा डोक्यात आणि चेहऱ्यावर हत्याराने वार करून तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १२) रात्री उघडकीस आली. या घटनेने पणदरे परिसरात खळबळ उडाली असून, माळेगाव पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच ते रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्यान पणदरे गावच्या हद्दीत तानाजी लक्ष्मण पवार यांच्या राहत्या घरातील खोलीत वैशाली पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. अज्ञात कारणातून त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर हत्याराने वार करण्यात आले.


त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वैशाली यांचे पती कामानिमित्त वडगाव निंबाळकर येथे गेले होते. रात्री ते घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. खून करण्यासाठी नेमके कोणते हत्यार वापरण्यात आले, तसेच या हल्ल्यामागील कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२५, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.