लढाई आता अंतिम टप्प्यात… मनोज जरांगेंची मुंबईकडे पावलं? आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

मुंबई : मराठा आरक्षणातील कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा आणि मागण्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने अद्याप त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
दरम्यान, मुंबईत आंदोलन करण्यासाठी परवानगी आवश्यक असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने कालच जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन न करण्यास बजावले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदूंच्या सणांच्या काळात शिवरायांचे मावळे आंदोलन करणार नाहीत, अशी भावनिक साद घातली आहे.

मात्र, आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करणार की सबुरीची भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज आंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक होत असून, या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हा सध्या कळीचा मुद्दा ठरला आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सरकारला स्पष्ट इशारा दिला. “आम्ही कायद्याला धरून अर्ज केला आहे. परवानगी देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजत आहे. न्यायालयापेक्षा मोठे समजत आहे.
संविधानाचे उल्लंघन करत आहेत. आता सरकारनेही नियम पाळले पाहिजेत. सरकार परवानगी देईल आणि आझाद मैदानावर उपोषणसुद्धा होईल,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. मात्र, मुंबईतील आंदोलनाबाबत अंतिम निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांची आज राज्यव्यापी बैठक
“लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. घरी बसू नका,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले आहे. त्यांच्या आवाहनानंतर आंतरवाली सराटीत गर्दीचा ओघ सुरू झाला आहे.
आज आंतरवाली सराटीत राज्यव्यापी बैठक होणार असून, दुपारी 12 वाजता बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची पुढील रूपरेषा जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या आणि त्यावर सरकारकडून देण्यात आलेला प्रतिसाद यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांची ‘नो कमेंट’
आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मात्र, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मुद्द्यावर अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलणे टाळले. आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता, “आज टंचाईची बैठक आहे, टंचाईवरच बोलू,” असे म्हणत त्यांनी विषय बदलला.
मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई कूचच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंतरवाली सराटीत स्वच्छता मोहीम
दरम्यान, आंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले स्वयंसेवक आंदोलनस्थळी झाडलोट करताना दिसत आहेत.
पहाटेपासूनच स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, आंदोलनस्थळी सडा-रांगोळीही काढण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या राज्यव्यापी बैठकीपूर्वी आंतरवाली सराटीत मोठी लगबग पाहायला मिळत आहे.