अखेर मनोज जरांगेंचं ठरलं! थेट मुंबई गाठणार, उद्या सर्वात मोठी घोषणा; अंतरवालीत घडामोडींना वेग


मुंबई : अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आंतरवाली सराटीत 14 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणानंतर जरांगे पाटील आता मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. मुंबईला जाण्याची तारीख ते उद्या जाहीर करणार आहेत.

जरांगे पाटील मुंबईला जाण्याची तारीख उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट करणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुंबईकडे जाण्याची तयारीही सुरू झाली असून, आंतरवाली सराटीत यासंदर्भात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

जालना ते मुंबई प्रवासासाठी मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनमधून जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधवही मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे.

सकल मराठा समाजाकडून मुंबईकडे जाण्यासाठी ही व्हॅन तसेच असंख्य वाहने तयार ठेवण्यात आली आहेत. जरांगे पाटील यांनी तारीख जाहीर करताच आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी कोणती तारीख जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आधी बैठक, मग मुंबईच्या दिशेने कूच?

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडक देऊ, असा निर्धार जरांगे पाटील यांनी यापूर्वीच व्यक्त केला होता.

याच पार्श्वभूमीवर उद्या आंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याची तारीख आणि आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे.

रात्री उशिरा लावली सलाईन

दरम्यान, सलग 14 दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना सलाईन लावण्यात आली असून, वैद्यकीय पथकाने रात्री त्यांच्या रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी केली.

धाराशिवमध्ये मध्यरात्री रास्ता रोको

दुसरीकडे, धाराशिवमध्ये काल रात्री 12 वाजता मराठा आंदोलकांनी रास्ता रोको करत सरकारचा निषेध केला. लातूर-पुणे महामार्गावरील तेरणा नदी पुलावर लाकडे पेटवून आंदोलकांनी आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!