दहीहंडीचा दणदणाट भोवला; पुण्यात पहिला गुन्हा दाखल, मंडळावर मोठी कारवाई


पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बिबवेवाडी परिसरातील दहीहंडी मंडळावर निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक लाऊडस्पीकर लावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्सव काळात ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी कारवाई झालेलं हे राज्यातील पहिलं दहीहंडी मंडळ असल्याची माहिती समोर आली आहे.

परवानगीपेक्षा दुप्पट साऊंड सिस्टम

बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दहीहंडी उत्सवासाठी मंडळाला लाऊडस्पीकरचे 4 बेस आणि 4 टॉप वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर लावण्यात आल्याचा आरोप आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनिवर्धक वापरल्याने परिसरात ध्वनी प्रदूषण झालं आणि नागरिकांना त्रास झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

साऊंड सिस्टम पोलिसांनी केली जप्त

नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मंडळाची साऊंड सिस्टम जप्त केली. तसेच संबंधित मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण तरुण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पारंपरिक वाद्य वापरण्याचा परवाना घेतला होता. मात्र, लाऊडस्पीकर वापराबाबत देण्यात आलेल्या लेखी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका मंडळावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांचा आधीच इशारा

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाबाबत आधीच नियम स्पष्ट केले होते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंडळांना निर्धारित मर्यादेतच साऊंड सिस्टम वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. नियमांचं उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान, पुण्यात विविध भागांत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अनेक मंडळांकडून नियमांचं पालन करत उत्सव साजरा केला जात असून काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. मात्र, बिबवेवाडीतील या कारवाईमुळे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!