कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा तेजी; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या का? पाहा आजचा भाव

नवी दिल्ली : देशातील वाहनधारकांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले असून, इंधनाच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर सध्या जुन्याच पातळीवर कायम आहेत.
मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ होत असल्याने आगामी काळात पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूडच्या दरात ०.३१ टक्क्यांची वाढ होऊन तो ९५.३३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट म्हणजेच WTI क्रूडचा दर ०.१४ टक्क्यांनी वाढून ९०.८८ डॉलर प्रति बॅरल झाला.

२४ जुलैनंतर कच्च्या तेलाचे दर पुन्हा या पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील या हालचालींचा परिणाम भविष्यात देशातील इंधनाच्या दरांवर होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचा दर
शनिवारच्या दरानुसार मुंबईत पेट्रोल ₹१११.२१ प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात ₹१३३.५१, चेन्नईत ₹१०७.७६ आणि बेंगळुरूमध्ये ₹१११.६८ प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे.
हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर ₹११५.७२, गुरुग्राममध्ये ₹१०३.२८, नोएडामध्ये ₹१०१.८८ आणि चंदीगडमध्ये ₹१०१.५४ प्रति लिटर आहे. लखनौमध्ये ₹१०२.३१, जयपूरमध्ये ₹११३.९१, पटनामध्ये ₹११३.३७, तर भुवनेश्वरमध्ये ₹१०८.९७ प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे.
डिझेलच्या दरातही कोणताही बदल नाही
पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत डिझेल ₹९७.८३ प्रति लिटर, कोलकात्यात ₹९९.८२, चेन्नईत ₹९९.५५ आणि बेंगळुरूमध्ये ₹९९.५६ प्रति लिटर आहे.
हैदराबादमध्ये डिझेल ₹१०३.८३, गुरुग्राममध्ये ₹९५.९४, नोएडामध्ये ₹९५.३६, चंदीगडमध्ये ₹८९.४७ आणि लखनौमध्ये ₹९५.७९ प्रति लिटर आहे. जयपूरमध्ये ₹९८.२५, पटनामध्ये ₹९९.३६ तर भुवनेश्वरमध्ये डिझेलचा दर ₹१००.६८ प्रति लिटर आहे.
मे महिन्यात झाली होती इंधन दरवाढ
यावर्षी मे महिन्यात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग चार वेळा वाढ केली होती. २०२२ नंतर पहिल्यांदाच १५ मे रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर २५ मेपर्यंत आणखी तीन वेळा दरवाढ झाली. या वाढीनंतर पेट्रोलच्या किमतीत एकूण ₹७.५० प्रति लिटरपर्यंत वाढ झाली होती.
आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार का, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.