वळती येथील 56 वर्षीय शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच मृत्यू; तालीवर ट्रॅक्टर घालणे पडले अंगाशी…


उरुळी कांचन : शेतात ट्रॅक्टरने मशागतीचे काम करत असताना अचानक तालीवरून ट्रॅक्टर उलटल्याने खाली चिरडून एका 56 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोपान कैरू कुंजीर (वय 56 वर्ष, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शुक्रवारी (ता. 04) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वळती गावच्या हद्दीतील स्वतःच्या शेतात काम करत असताना हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोपान कुंजीर हे शुक्रवारी सकाळी आपल्या स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने शेतात मशागतीचे काम करत होते. मशागत करत असताना अचानक ट्रॅक्टरचा तोल गेला आणि तालीवरून ट्रॅक्टर थेट शेतात उलटला. ट्रॅक्टर उलटल्याने सोपान कुंजीर हे त्याच्याखाली गंभीररीत्या दाबले गेले.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आदेश रोहीदास कुंजीर, चुलत भाऊ जितेंद्र दत्तात्रय कुंजीर व स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून सोपान कुंजीर यांना ट्रॅक्टरखालून बाहेर काढले.अपघातात सोपान कुंजीर यांच्या डोक्याला आणि हाताला अत्यंत गंभीर मार लागला होता.

नातेवाइकांनी त्यांना तात्काळ स्वतःच्या चारचाकी वाहनातून उपचारासाठी श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, उरुळी कांचन येथे हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले. मृतक सोपान कुंजीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विशाल असा परिवार आहे. एक कष्टकरी आणि अभ्यासू शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी जाण्याने वळती परिसरावर आणि कुंजीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी आदेश रोहीदास कुंजीर (वय 26, रा. वळती) यांनी दिलेल्या खबरी जबाबावरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!