पावसाने पुन्हा रंग बदलला! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट, जोरदार बरसणार


पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप घेतली असली, तरी आता पुन्हा हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज, ३ सप्टेंबर रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून काही भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव परिसरात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.

कोकणात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

जळगावला आज आणि उद्याही येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतही काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरींची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी सरीही कोसळू शकतात. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पावसाने उघडीप घेतल्याने काही भागांत उष्णता जाणवत असून अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी जोरदार आणि वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट नाही.

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस, तसेच वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उद्याही विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे.

एकूणच, राज्यातील अनेक भागांत हवामानात बदल जाणवत असला तरी सर्वदूर पाऊस झालेला नाही. सध्या विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव परिसरात पावसाची शक्यता अधिक असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!