पुणेकरांनो लक्ष द्या! ५ सप्टेंबरला PMPML बस मार्गांत मोठे बदल; दहीहंडीसाठी ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे PMPMLच्या बससेवेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. उत्सवादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी PMPML प्रशासनाने पर्यायी बसस्थानके आणि मार्गांचे नियोजन केले आहे.
त्यानुसार ३, ४ आणि ५ सप्टेंबर रोजी विविध बस मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर मार्ग क्रमांक १७ (नऱ्हेगाव-शिवाजीनगर) आणि ५० (शनिवारवाडा-सिंहगड) या बसेस सारसबाग येथून सुटतील. तर मार्ग क्रमांक ११३ (अ. ब. चौक-सांगवी) वरील बसेस मनपा नदीकाठ स्थानकावरून धावतील.

याशिवाय ८, ९, ५७, ८१, ९४, १०८, १४३, १४४ आणि २८३ या मार्गांवरील बसेस डेक्कन जिमखाना, मनपा भवन आणि गाडीतळ (जुना बाजार) मार्गे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी बससेवेतील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मार्ग क्रमांक २, ११, १३, २१, ३७, ३८ आणि रातराणी-१ या बसेस येताना जे. एम. रोड, डेक्कन आणि टिळक रोडमार्गे येतील. मात्र, स्वारगेटहून जाताना या बसेस नेहमीप्रमाणे बाजीराव रोडमार्गे धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बसच्या दोन्ही दिशांतील मार्गाची माहिती घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, मार्ग क्रमांक ७, ६८ आणि २०२ या बसेस ३ आणि ४ सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर स्वारगेट आणि टिळक रोडमार्गे धावतील. वाहतूक व्यवस्थेतील बदलांनुसार या मार्गांवर तात्पुरते वळण देण्यात येणार आहे.
स्वारगेट आगाराकडून चालवले जाणारे मार्ग क्रमांक ३ आणि ६ हे ५ सप्टेंबर रोजी दिवसभर पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी बससेवेचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे.
दहीहंडी उत्सवादरम्यान नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी बस मार्गांतील बदलांची नोंद घेऊन पर्यायी स्थानकांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी PMPML प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.