मंत्री चंद्रकांत पाटील, माजी नगरसेविकेबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ भोवला; युट्युबर संतोष पंडित मध्यरात्री अटकेत


पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात विकासकामांवरून मंत्र्यांना प्रश्न विचारणारे प्रसिद्ध युट्यूबर संतोष पंडित कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ३ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १ वाजता त्यांच्या राहत्या ठिकाणाहून पोलिसांनी ही कारवाई केली.

मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप संतोष पंडित यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत पंडित यांना अटक केली.

संतोष पंडित यांनी त्यांच्या युट्यूब अकाउंटवरून संबंधित व्हिडिओ प्रसारित केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बदनामीकारक आणि आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तक्रारदार महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेतील कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांचे पथक संतोष पंडित यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, संतोष पंडित हे कोथरूडमधील विकासकामांबाबत विविध प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करत असतात. अगदी अलीकडेच त्यांनी कारच्या नंबर प्लेटवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना जाब विचारला होता. त्यानंतर आता त्यांच्या अटकेची बातमी समोर आल्याने पुण्यात चर्चेला उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!