जरांगेंच्या प्रकृतीने आंदोलनाला नवं वळण; ४ तरुणांचा अन्नत्याग, परभणी बंद; महामार्गांवर ठिय्या


जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलनाची तीव्रता राज्यभर वाढताना दिसत आहे. अंतरवली सराटीकडे समर्थकांची गर्दी वाढत असतानाच नांदेडमध्ये चार तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. परभणीत दीड तास रास्ता रोको केल्यानंतर उद्या जिल्हा बंदची हाक देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालन्यातही आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव वाढवला आहे.

नांदेडमध्ये चौघांचा अन्नत्याग

भोकर तहसील कार्यालयासमोर बालाजी पाटील कदम बटाळकर चार दिवसांपासून अन्नत्याग करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. निवघा बाजार येथे लक्ष्मण पाटील कदम आणि ओमप्रकाश पाटील कदम जलकुंभावर बसून उपोषण करत आहेत. तर सोपान नेव्हल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे.

परभणीत बंदची घोषणा

पाथरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाजाने सुमारे दीड तास रास्ता रोको केला. जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला. निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याची भूमिका घेत उद्या परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

पैठण, धाराशिव, जालन्यातही रस्ते रोखले

पैठणच्या सह्याद्री नाका चौकात आंदोलकांनी रास्ता रोको करत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्या. धाराशिव–औसा मार्गावरील चिखली फाटा येथे टायर पेटवून आंदोलन करण्यात आलं. जालन्यात धुळे–सोलापूर महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनांमुळे काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं.

जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असताना सरकारने मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन राज्यभर आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!