पहिली बायको असताना केलं दुसरं लग्न, दुसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक; विरारमध्ये खळबळ


विरार : घरात पहिली पत्नी असताना पतीने दुसरा विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये समोर आला आहे. पती दुसऱ्या पत्नीला अचानक घरी घेऊन आल्यानंतर पहिली पत्नी संतापली. दोघींमध्ये वाद झाल्यानंतर पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीवर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

विरार पश्चिमेकडील बोलिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पहिल्या पत्नीने चाकू आणि त्रिशूळाने केलेल्या हल्ल्यात दुसरी पत्नी कोमल सरोज (वय २२) जखमी झाली. जखमी अवस्थेत कोमलने पोलिसांच्या ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिची सुटका केली.

नेमकं काय घडलं?

विरारमधील मे फेअर गार्डन परिसरात लक्ष्मी प्रसाद (वय ३१) ही पतीसोबत राहत होती. दरम्यान, तिच्या पतीने जुलै २०२६ मध्ये कोमल सरोजसोबत दुसरा विवाह केला. मात्र, या विवाहाची माहिती पहिल्या पत्नीला देण्यात आली नव्हती.

रविवारी पती अचानक दुसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला. त्यानंतर पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी यांच्यात वाद सुरू झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर लक्ष्मीने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि कोमलवर हल्ला केला.

हल्ल्यादरम्यान कोमलने स्वतःचा बचाव करण्यासाठी बेडरूममध्ये धाव घेतली. जखमी अवस्थेत तिने ११२ हेल्पलाईनवर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांना माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा उघडून पोलिसांनी कोमलची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आरोपी पत्नीला अटक

या प्रकरणी बोलिंज पोलिसांनी लक्ष्मीला अटक केली आहे. तिला वसई न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तिच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोमलवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास बोलिंज पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!