फाशी घेण्याची वेळ आली तरी… जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने आंतरवाली सराटीत खळबळ; जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही..


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आंतरवाली सराटीत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सरकारच्या हालचालीही वाढल्या आहेत. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी १२ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजातील आंदोलकांनी टप्प्याटप्प्याने मुंबईकडे निघावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच आझाद मैदानावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक यांनी त्यांची भेट घेतली.

आशिमा मित्तल आणि जरांगे यांच्यात संवाद

भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र, सरकारची भूमिका जरांगे पाटील यांना मान्य झाली नाही. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असताना जरांगे यांनी, “तुम्ही सरकारची बाजू घ्यायला इथे आला आहात का?” असा सवाल केला.

त्यावर आशिमा मित्तल यांनी, “ते माझं काम आहे,” असे उत्तर दिले. यावर जरांगे यांनी म्हटले की, सरकारमुळे चांगल्या चांगल्यांना फाशी घेण्याची वेळ आली.. सरकारवर टीका करताना त्यांनी हे बोलले.

जरांगे यांच्या वक्तव्याचा संदर्भ गैरसमजल्याने आशिमा मित्तल यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरीही आपली तयारी आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही क्षण वातावरण शांत झाले.

यानंतर जरांगे पाटील यांनी मित्तल यांना थांबवत “तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका,” असे सांगितले.

पुढे जरांगे म्हणाले की, “एक प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होईल. मी काय बोलतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही कशाला या भानगडीत पडत आहात?”

अधिकाऱ्यांना उद्देशून जरांगे यांनी पुढे म्हटले की, “तुम्ही अभ्यास करून मोठ्या झालेल्या लेकरं आहात. सरकारमध्ये चौथी नापास लोक मंत्री आहेत. ते तुम्हाला शिकवून इकडे पाठवत आहेत. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून इथपर्यंत पोहोचला आहात. तुमची यूपीएससी आणि एमपीएससीची पुस्तकं त्यांना वाचता येणार नाहीत.”

या संवादामुळे आंतरवाली सराटीत काही काळ वातावरण गंभीर झाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!