राज्यात पावसाची स्थिती चिंताजनक; १८ जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट, ३२ जिल्ह्यांत तूट


पुणे : यंदाच्या मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव जाणवत असल्याचे चित्र आहे. १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ११ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील ३६ पैकी तब्बल ३२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

यातील १८ जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक असून, हे जिल्हे ‘रेड झोन’मध्ये नोंदवण्यात आले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्टमध्ये अल-निनोचा प्रभाव अधिक जाणवला, तर जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला.

ऑगस्टमध्ये विदर्भ-मराठवाड्याला मोठा फटका

ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची मोठी तूट राहिली. या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे सुमारे ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

सप्टेंबरमध्येही पाऊस कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांवर दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

१ जून ते ३० ऑगस्टदरम्यान पावसाची स्थिती

महाराष्ट्र: ११ टक्के तूट — सरासरी ८०५.६ मिमी, प्रत्यक्ष ७१६.४ मिमी
कोकण: ९ टक्के तूट — सरासरी २४७८.२ मिमी, प्रत्यक्ष २२५८.४ मिमी
मध्य महाराष्ट्र: ८ टक्के अधिक — सरासरी ५३८.९ मिमी, प्रत्यक्ष ६३१ मिमी
मराठवाडा: २९ टक्के तूट — सरासरी ४७४.६ मिमी, प्रत्यक्ष ३३६.२ मिमी
विदर्भ: २५ टक्के तूट — सरासरी ७७१.७ मिमी, प्रत्यक्ष ५७९.२ मिमी

या चार जिल्ह्यांत अतिवृष्टी

राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक ५५ टक्के, सातारा ३९ टक्के, पुणे ३२ टक्के आणि पालघर २८ टक्के.

१८ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये

पावसाची मोठी तूट असलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि वाशिम यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट २० ते ४८ टक्क्यांपर्यंत नोंदवण्यात आली आहे.

१४ जिल्ह्यांतही पावसाची कमतरता

कोल्हापूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, धुळे, जळगाव, सांगली, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बुलडाणा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

राज्यातील तालुक्यांची स्थिती काय?

१ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांची पावसाची स्थिती तपासण्यात आली. त्यापैकी:

१४ तालुके: अत्यल्प पाऊस
१३० तालुके: खूप कमी पाऊस
१३२ तालुके: साधारण पाऊस
७९ तालुके: मुसळधार

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!