साखर-गुळाच्या दरांना ‘ब्रेक’! ४ दिवसांत गुळात तब्बल ₹१,६००ची घसरण; साखरही ₹६५ वरून ₹५२वर, केंद्राच्या निर्णयाचा मोठा परिणाम


नवी दिल्ली : साखर आणि गुळाच्या वाढत्या किमतीमुळे आधीच त्रस्त झालेल्या सामान्य ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांत बाजारात झालेल्या उलटफेरीमुळे साखर आणि गुळाच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांत गुळाच्या दरात सुमारे १,६०० रुपये प्रतिक्विंटलची घट झाली असून, साखरेचा दरही अनेक बाजारपेठांमध्ये ६५ रुपयांवरून थेट ५२ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला आहे.

गेल्या काही दिवसांत साखरेच्या दराने अचानक उसळी घेतल्याने घरगुती खर्चाचे गणित बिघडले होते. अनेक शहरांमध्ये गुळाचा दर तब्बल ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून, बाजारात गुळाचे दर ५,४०० ते ५,८०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आले आहेत. त्यामुळे किराणा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

साखर आणखी स्वस्त होणार?

दरम्यान, आगामी काळात साखरेच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारातील पुरवठा आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बाजारावर दिसून येत असल्याचे चित्र आहे. आयातीमुळे बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम दरांवर होऊ शकतो.

साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्यानंतर सरकारने साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी तपासणी आणि कारवाई सुरू केली आहे. साखर साठवून ठेवलेल्या गोदामांचीही चौकशी केली जात असून, बाजारातील उपलब्ध साठा आणि पुरवठ्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

महागाईवरून विरोधक आक्रमक

साखरेच्या वाढत्या दरावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला आंदोलनाचा इशाराही दिला होता.

आता साखर आणि गुळाच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत असली, तरी १० लाख टन साखर आयात, साठेबाजीविरोधातील कारवाई आणि बाजारातील पुरवठा यामुळे पुढील काळात दर आणखी खाली येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!