ऐन सणासुदीत साखर-गूळ स्वस्त; गुळाच्या दरात तब्बल 1600 रुपयांची घट, काय कारण?


मुंबई : श्रावण महिना आणि गणेशोत्सव तोंडावर आल्याने राज्यात साखर आणि गुळाची मागणी वाढली आहे. त्यातच मागील महिनाभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने किरकोळ बाजारात साखरेचा भाव सत्तरीपार पोहोचला होता. याचा परिणाम गुळाच्या दरावरही झाला होता.

मात्र, केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतर साखरेच्या दरात घसरण सुरू झाली असून, त्याचा परिणाम गुळाच्या बाजारावरही दिसून येत आहे. बुधवारी साखरेचा किरकोळ दर प्रतिकिलो 52 रुपयांपर्यंत खाली आला, तर गुळाच्या दरातही क्विंटलमागे तब्बल 1600 रुपयांची घट झाली.

ऐन श्रावणात गुळाचे भाव घसरले

साखरेच्या दरात घसरण सुरू असतानाच गुळाचे दरही कमी झाले आहेत. चार दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल 7 हजार रुपयांनी विकला जाणारा गूळ आता 5,400 ते 5,800 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे.

अवघ्या काही दिवसांत क्विंटलमागे सुमारे 1600 रुपयांची घसरण झाल्याने गूळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढण्याची अपेक्षा असतानाच बाजारभाव घसरल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे.

साखर आणखी स्वस्त होणार?

साखरेच्या दरातील घसरण बुधवारीही कायम राहिली. साखरेचा दर प्रतिकिलो 52 रुपयांपर्यंत खाली आला आहे. संभाव्य टंचाई आणि साठेबाजीच्या संशयावरून केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे साखरेचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साखरेच्या दरवाढीनंतर केंद्र सरकारने व्यापारी आणि साखर कारखान्यांकडील प्रत्यक्ष साठ्याची तपासणी सुरू केली आहे. तसेच 10 लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपाययोजनांचा परिणाम म्हणून गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात प्रतिकिलो 13 रुपयांची घट झाली असून, दर 65 रुपयांवरून 52 रुपयांपर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे दर आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

साठेबाजीच्या चर्चेला उधाण

साखरेची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात सरकारने कडक भूमिका घेतली असून विविध गोदामांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे व्यापारी आणि साखर कारखानदारांनाही तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, साठेबाजी नेमकी कुणी केली, यावरून व्यापारी आणि कारखानदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांमध्येही चिंता निर्माण झाली होती. आता दर घसरू लागल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!