सोशल मीडियावर ‘लाईक्स’ मिळवण्यासाठी नको ते केलं; बारामतीतील तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, ‘ही’ चूक पडली महागात

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण धोकादायक प्रकार करताना दिसतात. अशाच प्रकारात बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील एका तरुणाला हातात पिस्तूल घेऊन रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. पिस्तूल दाखवून सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रेम प्रताप जगताप याच्यावर सुपा पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
व्हायरल रील पोलिसांच्या निदर्शनास
प्रेम जगताप याने हातात पिस्तूलासारखे घातक शस्त्र घेऊन रील तयार केली होती. त्यानंतर ही रील सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो सुपा पोलिसांच्या निदर्शनास आला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रेम जगताप याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांचा तरुणांना इशारा
सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या रील्सवर पुणे ग्रामीण पोलिसांची करडी नजर आहे. या कारवाईनंतर सुपा पोलिसांनी तरुणांना अशा प्रकारच्या रील्सपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
केवळ काही सेकंदांची प्रसिद्धी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी केलेले कृत्य कायदेशीर अडचणीत आणू शकते. त्यामुळे शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्या रील्स तयार करू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.