धक्कादायक! जेवणासाठी आलेल्या मुलींना नको तिथे स्पर्श करायचा; आदिवासी आश्रमशाळेतील 21 विद्यार्थिनींचा विनयभंग


शहापूर : आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गडचिरोलीतील घटनेनंतर आता शहापूरमधील टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 21 अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत झिपरू गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे.

टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीतच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. मुलांचे व मुलींचे निवासाचे मजले वेगवेगळे आहेत. जेवणासाठी तसेच कपडे धुण्यासाठी विद्यार्थिनींना वारंवार खाली यावे लागते. याच वेळी आरोपीकडून विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले जात असल्याचा आरोप आहे.

विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार, जेवणाचे ताट धुण्यासाठी त्या खाली आल्यानंतर आरोपी त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचे समोर आले. तसेच दहावीतील एका विद्यार्थिनीशी त्याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

विद्यार्थिनींनी धाडसाने सांगितला प्रकार

आरोपीच्या वर्तनाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींनी अखेर ही बाब वसतिगृह अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अधीक्षक विद्यार्थिनींना सोबत घेऊन शहापूर पोलीस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 354 तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

याआधीही गैरवर्तनाचा आरोप?

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीविरोधात यापूर्वीही आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, असा दावा केला जात आहे.

मात्र, आधीच गंभीर आरोप झालेल्या व्यक्तीला पुन्हा त्याच आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या संपर्कात येणाऱ्या कामावर कसे नियुक्त करण्यात आले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडून सखोल चौकशी होण्याची मागणी केली जात आहे.

पालकांमध्ये संताप

या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. मुलींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी आश्रमशाळेत पाठवले जाते. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

या प्रकरणात आरोपीवर कारवाईसोबतच त्याला पुन्हा आश्रमशाळेत काम देण्यामागे कोणाची भूमिका होती, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील आणखी कोणते तथ्य समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!