पुणेकरांची ओळख बदलणार! ‘MH12’नंतर आता वाहनांवर झळकणार ‘MH61’; आरटीओचा मोठा निर्णय


पुणे : पुणेकरांच्या जिव्हाळ्याची ओळख असलेली ‘MH12’ वाहन क्रमांक मालिका आता नव्या टप्प्यात पोहोचली आहे. पुण्यातील वाढती वाहनसंख्या आणि ‘MH12’ मालिकेतील उपलब्ध क्रमांक संपल्याने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आता नवीन चारचाकी वाहनांसाठी ‘MH61’ ही नवी मालिका सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे यापुढे पुण्यात नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांवर MH61 क्रमांकाची नंबरप्लेट दिसणार आहे. उदाहरणार्थ, नवीन मालिकेतील क्रमांक MH61 A 0001 अशा स्वरूपात असू शकतो.

नवीन मालिका सुरू होत असल्याने वाहनधारकांमध्ये पसंतीच्या क्रमांकासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. वाहन नोंदणीच्या पहिल्याच दिवशी पुणे आरटीओ कार्यालयात मोठी गर्दी होऊ शकते. ही गर्दी टाळण्यासाठी तसेच वाहनधारकांना पसंतीचा क्रमांक मिळवणे सोपे व्हावे यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. विशेष किंवा पसंतीच्या क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया देखील जाहीर केली जाणार आहे.

पुणेकरांसाठी ‘MH12’ हा केवळ वाहन क्रमांक नसून शहराची खास ओळख मानली जाते. त्यामुळे ही मालिका पुढेही कायम ठेवण्यासाठी ‘MH12 1A’ असा पर्याय सुचवण्यात आला होता. पुणे आरटीओकडून केंद्र सरकारकडे यासंदर्भात प्रस्तावही पाठवण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुण्याची MH12 ओळख कायम ठेवण्याची मागणी केली होती. मात्र वाहन नोंदणीच्या नियमांमुळे हा पर्याय पुढे जाऊ शकला नाही.

दोन अक्षरांच्या कोडनंतर तीन अक्षरांची मालिका देण्यास नियमांनुसार मर्यादा असल्याने ‘MH12 AAA’ किंवा ‘MH12 AAA 1234’ अशा पद्धतीने नवीन क्रमांक देणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘MH12 1A’चा प्रस्ताव बाजूला ठेवून पुण्यासाठी स्वतंत्र MH61 कोड निश्चित करण्यात आला आहे. यामुळे पुण्याच्या वाहन नोंदणी व्यवस्थेला आता नवी ओळख मिळणार आहे.

महाराष्ट्रात वाढत्या वाहनसंख्येमुळे विविध शहरांना आणि आरटीओ उपविभागांना स्वतंत्र मालिका देण्यात आल्या आहेत. MH53 पिंपरी-चिंचवड, MH54 वाशी-नवी मुंबई, MH55 कल्याण-डोंबिवली, MH56 छत्रपती संभाजीनगर, MH57 जळगाव, MH58 नाशिक-मालेगाव, MH59 सोलापूर-पंढरपूर आणि MH60 अहिल्यानगर-संगमनेर यांना स्वतंत्र कोड देण्यात आले आहेत. आता या क्रमवारीतील MH61चा मान पुण्याला मिळाला आहे.

दरम्यान, MH61 सुरू झाल्यामुळे जुन्या MH12 वाहनधारकांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आधीपासून नोंदणी झालेल्या वाहनांचे MH12 क्रमांक बदलले जाणार नाहीत. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर जुन्या वाहनांवर MH12 आणि नव्या वाहनांवर MH61 अशा दोन्ही नंबरप्लेट पाहायला मिळतील. मात्र नव्याने वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी MH61 ही पुण्याची नवी वाहन ओळख ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!