दिवाळीआधी साखरेचा भाव भडकणार? किलोचा दर शंभरी पार जाण्याची शक्यता; केंद्राचे कडक निर्बंध..

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या दराबाबत चिंता वाढली आहे. खुल्या बाजारात साखरेचा भाव सध्या 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. दिवाळीच्या काळात मागणी वाढल्यास साखरेचा दर 100 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या साठ्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
राज्यात दर महिन्याला सरासरी 3 लाख टन साखरेची गरज असते. सध्या राज्यात 17 ते 18 लाख टन साखरेचा साठा उपलब्ध असल्याचे साखर विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राज्यात साखरेची कमतरता नसली तरी सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी आणि इतर राज्यांना होणारा पुरवठा यामुळे दरांवर दबाव येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून दक्षिणेकडील काही राज्यांना मोठ्या प्रमाणावर साखरेचा पुरवठा केला जातो. त्यामुळे राज्यातील उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त दबाव निर्माण होऊ शकतो. दिवाळीत मिठाई, फराळ तसेच विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत असल्याने व्यापाऱ्यांकडून अनावश्यक साठेबाजी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.


व्यापाऱ्यांवर केंद्राचे कडक निर्बंध
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार व्यापाऱ्यांना एका ठिकाणी एकावेळी 400 टनांपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही. तसेच खरेदी केलेली साखर 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवण्यावरही निर्बंध आहेत.
दरम्यान, दिवाळीच्या काळातील वाढती मागणी लक्षात घेता राज्याला अतिरिक्त साखर कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा आणि दरांमध्ये अनावश्यक वाढ होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात साखरेचा किती साठा?
17 ते 18 लाख टन — सध्या राज्यात उपलब्ध साखर
3 लाख टन — राज्याची दरमहा सरासरी गरज
20 लाख टन — देशाची दरमहा साखरेची गरज
साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांच्या माहितीनुसार, राज्यात सध्या 17 ते 18 लाख टन साखरेचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरपासून साखर गाळप हंगाम सुरू होणार असल्याने पुढील काळात नव्या साखरेची बाजारात आवक सुरू होईल. त्यामुळे सध्या साखरेचा पुरेसा साठा असला तरी दिवाळीच्या काळात दर वाढू नयेत, यासाठी साठेबाजीवर प्रशासनाला विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे.