मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; भरधाव बसने 4 वाहनांना उडवलं, 10 जण जखमी

पनवेल : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला. भाताण बोगद्याजवळ एका भरधाव बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने समोरून जाणाऱ्या चार वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत तीन चारचाकी आणि एका टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या विचित्र अपघातात सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. या मार्गावर वेगाने होणारे अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान, या अपघातामागे नेमके कारण काय होते, याचा संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.