‘राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यापलीकडे काम काय?’; विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला, पुण्यातील ‘छात्रों की गुंज’वरून काँग्रेसला घेरलं


अहिल्यानगर : पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू असतानाच या कार्यक्रमावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप करत, रोहित पवारांनी त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावल्यावरून विखे पाटील यांनी खोचक टोला लगावला. “रोहित पवारांना आता एवढंच काम शिल्लक राहिलं आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट आंदोलनानंतर राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या आणि परीक्षा व्यवस्थेतील प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. मात्र, विखे पाटील यांनी या उपक्रमाच्या राजकीय हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभेत सलग तीन वेळा पराभव झाल्याने राहुल गांधींची जनतेतील प्रतिमा खराब झाली आहे आणि त्यामुळेच ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत आहेत, असा दावा विखे पाटील यांनी केला. सरकार पूर्वी सत्तेत असताना या प्रश्नांवर भूमिका का घेतली नाही? आता अचानक हे मुद्दे का उपस्थित केले जात आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना राहुल गांधींची भूमिका माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं स्वीकारण्यास विद्यार्थी तयार नाहीत, असेही विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणल्याची चर्चा असल्याचा आरोपही राजकीय वर्तुळात होत आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी ही बाब गंभीर असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आडून राजकीय नौटंकी होत असेल, तर त्यामागचे वास्तव जनतेसमोर आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

रोहित पवार यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पुण्यात बॅनर लावल्याच्या मुद्द्यावरही विखे पाटील यांनी टीका केली. काँग्रेसकडून भाजप राहुल गांधींना घाबरत असल्याची टीका करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना जनतेसमोर वास्तव मांडणे हे सर्वांचे काम असल्याचे विखे पाटील म्हणाले. याचवेळी रोहित पवारांवर निशाणा साधत त्यांच्याकडे आता राहुल गांधींच्या स्वागताचे बॅनर लावण्याशिवाय दुसरे काम उरले आहे का, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.

नीट परीक्षेबाबतही विखे पाटलांची मोठी मागणी करण्यात आली आहे. नीट परीक्षेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपण केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परीक्षा राज्य सरकारनेच घ्याव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. राज्य सरकारने परीक्षा घेतल्यास शासकीय महाविद्यालये आणि अनुदानित संस्थांची जबाबदारी वाढेल. तसेच कोचिंग क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून सुरू असलेली आर्थिक लूट रोखण्यास मदत होईल, असा दावा विखे पाटील यांनी केला.

याचवेळी अहिल्यानगरमधील पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरही विखे पाटील यांनी भाष्य केले. काही दिवसांपूर्वी १० ते १५ जणांच्या टोळक्याने थोरात यांच्यावर हल्ला केला होता. रुग्णालयात जाऊन विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. हा प्राणघातक हल्ला असल्याचे सांगत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापासून नीट परीक्षेच्या मुद्द्यापर्यंत आणि पत्रकार हल्ल्यापर्यंत विखे पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!