रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! भाडेवाढीला मंजुरी, 1 सप्टेंबरपासून किती पैसे मोजावे लागणार?


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

नव्या दरानुसार, काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये, तर रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे. सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर 1 सप्टेंबर 2026 पासून हे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.

टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे किती?

टॅक्सीचे सध्याचे प्रतिकिलोमीटर भाडे 20.66 रुपये आहे. भाडेवाढीनंतर ते 21.90 रुपये होणार आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान 33 रुपये आकारले जातील.

रिक्षाचे नवे दर

रिक्षाच्या प्रतिकिलोमीटर भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. सध्या 17.14 रुपये प्रतिकिलोमीटर असलेले भाडे आता 18.22 रुपये होणार आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये करण्यात येणार आहे.

भाडेवाढीमागे कोणते कारण?

खटुआ समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे ठरवले जाते. यामध्ये इंधनाचे दर, वाहनांची किंमत, ग्राहक किंमत निर्देशांक, वाहन कर्जावरील व्याजदर आणि सरकारी कर यांसारख्या घटकांचा विचार केला जातो.

मागील भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात सुमारे 10.25 टक्के वाढ झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती.

संघटनांची मागणी किती होती?

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून प्रतिकिलोमीटर भाडे 20.66 रुपयांवरून 25 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार किमान टॅक्सी भाड्यात दोन रुपयांची वाढ होणार आहे.

दरम्यान, रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीचे स्वागत केले असले तरी ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याची प्रतिक्रिया काही संघटनांनी दिली आहे.

PUC तपासणीही महागली

रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसोबतच राज्यातील वाहनधारकांसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल झाला आहे. महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात PUC तपासणीचे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी प्रवासासोबतच वाहनधारकांच्या खर्चातही वाढ होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!