‘फक्त पॉझिटिव्ह पोस्ट करा, नाहीतर पैसे नाही!’; राहुल गांधींच्या पुणे कार्यक्रमावर फडणवीसांचा गंभीर आरोप, 9-10 कोटींच्या खर्चाचीही चर्चा

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत गंभीर आरोप करत कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देऊन आणल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमासंदर्भात सोशल मीडियावर केवळ सकारात्मक मजकूर प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांच्या दाव्यानुसार, कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुलींपैकी 90 ते 95 टक्के मुली काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयांमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विद्यार्थिनींना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही कार्यक्रम आणि राहुल गांधी यांच्याबाबत फक्त सकारात्मक आशय प्रसिद्ध करण्यास सांगितले गेले. सकारात्मक पोस्ट केल्यास पैसे मिळतील, मात्र नकारात्मक मजकूर प्रसिद्ध केल्यास पैसे दिले जाणार नाहीत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

या आरोपांमुळे कार्यक्रमाच्या आयोजनामागील खर्च आणि निधीचा स्रोत यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कार्यक्रमासाठी सुमारे 3 हजार लोकांवर 30 ते 35 हजार रुपये खर्च होत असल्याचा तसेच एकूण कार्यक्रमावर 9 ते 10 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जात असल्याचा दावा केला होता. या पैशांचा स्रोत काँग्रेसने स्पष्ट करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या आरोपांची पुराव्यांच्या आधारे पडताळणी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसच्या एनएसयूआय आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि धुमश्चक्री झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, केवळ आपल्या कार्यकर्त्यांवरच कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
फडणवीस यांनी हा संपूर्ण प्रकार कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी निर्माण केलेला वाद असल्याचा आरोप केला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चर्चेसाठी वाद निर्माण केला जातो, त्याच धर्तीवर हा प्रकार घडवला जात असल्याचे ते म्हणाले. मात्र, या प्रकरणाकडे पोलिसांचे लक्ष असून
आरोपांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वीच कार्यक्रमाभोवती राजकीय आरोप-प्रत्यारोपांना चांगलीच धार आली आहे.