सलमान खानच्या जीमला भीषण आग; अग्निशमन दलाचं ऑपरेशन, मोठी अपडेट समोर

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या जिमला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू ग्रेटर कैलास-1 परिसरात ही घटना घडली. जिममध्ये आग लागल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, रात्री सव्वा दहाच्या सुमारास जिमच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच जिममधील सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही जिम सलमान खानच्या फिटनेस ब्रँडअंतर्गत चालवली जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील केला असून फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांकडून तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीमागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सलमान खान हा फिटनेससाठीही प्रसिद्ध असून तो अनेकदा सोशल मीडियावर आपल्या फिटनेसशी संबंधित पोस्ट शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या जिमला आग लागल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.