पोलिसांकडून उत्तर मिळालं नाही, राहुल गांधी संतापले; जखमी तरुणासह पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या..

नवी दिल्ली : पॅलेट गनच्या वापराच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांकडे थेट दाद मागितली आहे. या कारवाईत जखमी झालेल्या साहिल लोहबच याला सोबत घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.
पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. संबंधित विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची तक्रार अधिकृतपणे नोंदवून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी जवळपास अर्धा तास पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मात्र, पॅलेट गनच्या वापराबाबत तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, याची स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर ते जखमी तरुणासह पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देऊन बसले.


दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या पॅलेट गनच्या वापराची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत सीबीआयच्या माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समितीला आवश्यक मार्गदर्शक तत्त्वेही दिली आहेत. त्यामुळे आता राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर या प्रकरणाला आणखी राजकीय आणि कायदेशीर महत्त्व प्राप्त झालं आहे.