‘दादाला आणतो’ म्हणत घराबाहेर पडला, पण परतलाच नाही; छत्रपती संभाजीनगरात दोन भावांचा अपघाती मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : कामानिमित्त अवघ्या दोन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या दोन सख्ख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ‘दादाला घेऊन येतो’ असं सांगून घराबाहेर पडलेल्या कपिल आणि निखिल या भावांवर काळानं घाला घातला. या घटनेनं आरके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
निखिल अंकुश आरके (23) आणि कपिल अंकुश आरके (18) अशी मृत भावांची नावे आहेत. ते दोघेही सिडको परिसरातील प्रोझोन मॉलमधील चायनीज ओक आणि चटोरी रेस्टॉरंटमध्ये काम करत होते. ते त्यांचे मामा फकिरा गोविंदा पवार यांच्या घरी राहत होते.

बुधवारी (19 ऑगस्ट) रात्री कपिलची ड्युटी रात्री 9 वाजता संपली. घरी जेवण केल्यानंतर ‘दादाला घेऊन येतो’ असं सांगून तो दुचाकीवरून मोठ्या भावाला आणण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, घरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असतानाही तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही.


मामांनी कपिलला फोन केला असता सुरुवातीला फोन उचलला गेला नाही. काही वेळाने फोन उचलला, मात्र समोरून पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. ही बातमी ऐकताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
रात्री सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास आयटी पार्कमागील रस्त्यावर दोन्ही भाऊ दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव फॉर्च्युनर कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही भावांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पहाटे 2.27 वाजता तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात संबंधित कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अंकुश आरके हे सिल्लोड तालुक्यात मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलांनी शहरात जाऊन चांगलं काम करावं, या अपेक्षेने त्यांनी निखिल आणि कपिलला मामाकडे पाठवलं होतं. मात्र, शहरात आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दोन्ही मुलांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरके कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.