लखनऊ हादरलं! बँकेबाहेर पत्नीला संपवलं, घरी बहिणीवर गोळीबार; एकाच कुटुंबातील तिघांचा रक्तरंजित शेवट, कौटुंबिक वादाची धक्कादायक परिणती

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. गोमतीनगर परिसरात मानस नावाच्या व्यक्तीने आधी बँकेत काम करणाऱ्या पत्नी दिव्या मिश्रा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर घरी जाऊन स्वतःची बहीण विभा बाजपेयी हिच्यावर गोळ्या झाडल्या. बहिणीच्या हत्येनंतर मानसनेही स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मानस आणि दिव्या यांच्यात काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयातही प्रलंबित होतं. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मानसने दिव्याला फोन करून बँकेबाहेर बोलावून घेतलं. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्यानंतर अचानक त्याने बंदूक काढली आणि दिव्यांवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी दिव्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पत्नीवर गोळीबार केल्यानंतर मानस घटनास्थळावरून निघून हुसडिया येथील आपल्या घरी पोहोचला. तिथे त्याने बहिणी विभा बाजपेयी यांच्यावरही गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मानसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे पती, पत्नी आणि बहीण अशा एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला.


घटनेची माहिती मिळताच लखनऊ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हे हत्याकांडामागील कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या वादाचं नेमकं स्वरूप काय होतं आणि मानसने एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील पुरावे आणि कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.