मातोश्रीचा आदेश धुडकावला! धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा हादरा, 9 नगरसेवक कमळ हाती घेणार?

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाचे तब्बल 9 नगरसेवक आणि काँग्रेसचा एक नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
कळंब नगरपरिषदेतील हे सर्व नगरसेवक ठाकरे गटाचे प्रभावी चेहरे मानले जातात. त्यामुळे त्यांचा संभाव्य पक्षप्रवेश हा केवळ नगरपरिषद पातळीवरील बदल नसून धाराशिवच्या राजकीय समीकरणांना हादरा देणारी घडामोड ठरू शकते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीला स्थानिक पातळीवर मोठी ताकद मिळण्याची चर्चा सुरू आहे.

या घडामोडींमुळे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. कारण संभाव्य पक्षांतर करणारे बहुतांश नगरसेवक त्यांच्या मतदारसंघातील मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी ही घटना ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.


राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही नगरसेवकांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनी थेट शिंदे गटात न जाता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क वाढवण्यात आला होता. त्याचेच परिणाम आता दिसू लागल्याचे बोलले जात आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या विधानाचीही पुन्हा चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील आणखी काही बडे चेहरे महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे धाराशिवच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे. आता हे 9 नगरसेवक खरंच कमळ हाती घेतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.