शेतकऱ्यांची धनादेश देऊन फसवणूक भोवली! गूळ उत्पादकाला सक्तमजुरीची शिक्षा, न्यायालयाचा दणका

दौंड : शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन त्यापासून गूळ उत्पादन केल्यानंतर त्याची देय रक्कम न देता न वटणारे धनादेश देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गूळ उत्पादकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. बारामती येथील फौजदारी न्यायालयाने आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला.
दौंड तालुक्यातील दापोडी येथील आणेव फळ उत्पादक संस्थेचा गूळ उत्पादक सोमनाथ विश्वनाथ रूपनवर याच्याविरोधात हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. काळे यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

या प्रकरणातील फिर्यादी रविंद्र ज्ञानदेव चांदगुडे, रा. दंडवाडी (सुपे) यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन त्याची देय रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली होती. मात्र, हे धनादेश बँकेत सादर केल्यानंतर वटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रक्कम मिळाली नाही.


देय रक्कम मिळत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान प्रकरणातील बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
ऊस उत्पादनासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेतात. त्यामुळे त्यांच्या मालाची रक्कम वेळेवर मिळणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत धनादेश देऊन तो न वटल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
या निकालामुळे शेतकऱ्यांची देय रक्कम थकवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा संदेश गेला आहे. फिर्यादीच्या वतीने सुपे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. चंद्रशेखर रमेशराव जगताप यांनी काम पाहिले.