फक्त 2,500 रुपये भरा आणि 25 वर्षे वीजबिल विसरा! महावितरणच्या ‘स्मार्ट’ योजनेत मोठी संधी


पुणे : दर महिन्याला येणाऱ्या वीजबिलामुळे हैराण झालेल्या लाखो कुटुंबांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महावितरणच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (SMART) योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून तब्बल 47,500 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांना केवळ 2,500 रुपये भरून हा प्रकल्प उभारता येणार असून पुढील 25 वर्षे स्वतःची वीज निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती-जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना वीजबिलातून मुक्त करण्याचा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. महावितरणच्या माहितीनुसार, एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्माण करू शकतो. त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांच्या गरजा पूर्णपणे सौर ऊर्जेतून भागवणे शक्य होणार आहे.

या योजनेला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची जोड देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 30 हजार रुपयांचे अनुदान मिळते, तर राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार आहे. दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एकूण 47,500 रुपयांचे अनुदान मिळणार असून त्यांना केवळ 2,500 रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहकांचा हिस्सा 5 हजार रुपये तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांचा हिस्सा 10 हजार रुपये राहणार आहे.

योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी सप्टेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मासिक वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबवली जात असल्याने पात्र ग्राहकांनी लवकर अर्ज करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर, प्रधानमंत्री सूर्यघर पोर्टलवर किंवा संबंधित शाखा कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रियेसाठी महावितरणचे अधिकारी मार्गदर्शनही करणार आहेत.

वाढत्या वीजदरांच्या काळात स्वतःची वीज स्वतः तयार करून वीजबिलापासून मोठा दिलासा मिळवण्याची ही संधी असल्याने जळगाव, धुळे, नंदुरबारसह राज्यातील पात्र ग्राहकांनी या योजनेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहण्यास सुरुवात केली आहे. 25 वर्षांपर्यंत वीज निर्मितीचा लाभ आणि लाखोंची बचत मिळवून देणारी ही योजना सर्वसामान्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!