मराठा आंदोलनाला ब्रेक? मनोज जरांगे रुग्णालयात दाखल; 102 ताप, टायफॉइडच्या संशयाने डॉक्टर सतर्क


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे, सभा आणि बैठका घेणारे मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे त्यांना तीव्र अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना 102 अंशांपर्यंत ताप असल्याचे आढळून आले. तसेच टायफॉइडची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांनी विशेष खबरदारी घेत उपचार सुरू केले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला होता. या दौऱ्यात त्यांनी धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध ठिकाणी सभा, बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गावोगावी जाऊन त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. मात्र सततचा प्रवास, अपुरी विश्रांती आणि वाढलेला ताण याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे सांगितले जात आहे.

प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान तापासोबत घशात संसर्गाची लक्षणेही आढळल्याचे सांगितले. त्यांचे रक्तनमुने विविध चाचण्यांसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर आजाराचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून वैद्यकीय पथकाकडून नियमित निरीक्षण ठेवले जात आहे.

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांना पुढील चार दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या काळात कोणताही दौरा, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यास सांगण्यात आले आहे. प्रकृती स्थिर असली तरी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची बातमी समोर येताच मराठा समाजातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केल्या. काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट देण्याचाही प्रयत्न केला.

विशेष म्हणजे, आगामी काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवी दिशा देण्यासाठी जरांगे पाटील महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची चर्चा होती. अशातच त्यांची तब्येत बिघडल्याने आंदोलनाच्या पुढील कार्यक्रमांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र उपचारानंतर लवकरच पुन्हा मैदानात उतरणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

सध्या राज्यातील लाखो मराठा बांधवांचे लक्ष जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे लागले असून वैद्यकीय अहवालानंतरच त्यांच्या आरोग्याविषयीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!