कोल्हापुरातून रात्री निघा, पहाटे पुण्यात पोहोचा! एक्स्प्रेस आता रोज धावणार; वेळापत्रक, थांबे अन् तिकीट दराची संपूर्ण माहिती

पुणे : पुणे आणि कोल्हापूरदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस-कोल्हापूरदरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता नियमित करण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरपासून ही गाडी कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर दैनिक एक्स्प्रेस म्हणून दररोज धावणार आहे.
आतापर्यंत प्रवाशांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन ही रेल्वे विशेष स्वरूपात चालवली जात होती. मात्र, आता नियमित सेवा सुरू होत असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, नियमित सेवा सुरू झाल्यानंतर तिकीट दरात तब्बल 30 टक्के कपात करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने 14 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या कोचिंग नोटिफिकेशनमध्ये याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी 01023/01024 या क्रमांकाने धावणाऱ्या या गाडीला आता 11419/11420 हे नवीन क्रमांक देण्यात आले आहेत.


पुण्याहून ही गाडी रात्री 9.40 वाजता सुटेल आणि सकाळी 5.08 वाजता कोल्हापूरला पोहोचेल. तर कोल्हापूरहून रात्री 9.50 वाजता सुटून सकाळी 5.10 वाजता खडकीला पोहोचणार आहे.
या सेवेचा थेट फायदा पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरातील प्रवाशांना होणार आहे. मार्गात जेजुरी, नीरा, लोणंद, वाठार, सातारा, कराड, रहिमतपूर, तासवडे, मसूर, कोरेगाव, भवानीनगर, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, रुकडी आणि वळिवडे या स्थानकांवर गाडीला थांबा असेल.
पुणे ते कोल्हापूर हे 326.03 किलोमीटरचे अंतर ही एक्स्प्रेस सुमारे 7 तास 28 मिनिटांत पूर्ण करणार आहे. गाडीला 18 LHB डबे असतील, तर तिची देखभाल कोल्हापूर येथे केली जाणार आहे.
दरम्यान, या गाडीला पूर्वीच्या ‘सह्याद्री एक्स्प्रेस’च्या नावाने सुरू करण्याबाबत मध्य रेल्वे विचार करत असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली आहे.