लाडक्या बहिणींच्या जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा! मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट; योजनेबाबत काय म्हणाले?

मुंबई : राज्यातील कोट्यवधी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. आता जुलैच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथील भाजपच्या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं. “काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यातील 1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असल्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर योजना बंद करेल, असं सांगितलं जात होतं. मात्र, सरकारने योजना बंद केलेली नाही आणि पुढील काळातही ती बंद होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.


“पाचही वर्षे लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत राहणार,” असंही फडणवीस यांनी सांगितलं. यासोबतच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘लखपती दीदी’ करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं.
1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचं लक्ष्य
राज्यात आतापर्यंत 50 लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला. आता 1 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
जुलैच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानंतर करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असून, सध्या सुमारे 1 कोटी 67 लाख महिला या योजनेसाठी पात्र असल्याचे सांगण्यात येत आहे.