‘3 महिन्यांत नियम पाळा नाहीतर बस रस्त्यावरून गायब!’ पुण्यात स्कूल बसचालकांना पोलिसांचा अल्टिमेटम

पुणे : पुण्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने आता शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या स्कूल बसचालक आणि वाहतूकदारांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुणे शहर पोलिस सहआयुक्त संजय दराडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
बैठकीत शाळा प्रशासन, बसचालक आणि वाहतूकदारांना पुढील तीन महिन्यांत सर्व सुरक्षा निकष पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. बसमध्ये कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस-आधारित ट्रॅकिंग यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था, पॅनिक बटण आणि इतर सुरक्षा साधने अनिवार्य करण्यात आली आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला सहाय्यक किंवा अतिरिक्त कर्मचाऱ्याची उपस्थिती आवश्यक राहणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


याशिवाय, शाळांनी विद्यार्थी वाहतुकीची संपूर्ण माहिती ऑनलाइन प्रणालीवर अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शाळास्तरीय वाहतूक समित्यांनाही अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. पोलिस आणि आरटीओकडून संयुक्त तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असल्याने शहरातील स्कूल बस व्यवस्थेवर आता प्रशासनाचा कडक वॉच राहणार आहे.