‘आज नको’ एवढंच म्हटलं अन् पतीचा संताप अनावर! पत्नीचा गळा दाबला, चाकूने वार; आईला वाचवताना मुलगीही जखमी

पुणे : कंबरदुखीचा त्रास असल्याने पत्नीने पतीसोबत जवळ येण्यास नकार दिला. मात्र, या नकाराचा राग पतीच्या मनात इतका वाढला की त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात घडली. पतीने आधी दोन्ही हातांनी पत्नीचा गळा दाबून तिचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चाकूने तिच्या कमरेवर वार केले. आईचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या मुलीवरही चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत आई-मुलगी दोघी जखमी झाल्या आहेत.
११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता ३० वर्षीय फिर्यादी घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. कंबरदुखीच्या औषधांच्या गोळ्या घेत असताना त्यांचा ३५ वर्षीय पती मागून आला आणि तिला सोबत येण्यास सांगितले. मात्र, मुले जागी आहेत आणि कंबर दुखत असल्याने उद्या पाहू, असे सांगत महिलेने नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला धमकी दिली. तक्रारीनुसार, पतीकडून तिच्या चारित्र्यावर यापूर्वीही संशय घेतला जात होता.

रागाच्या भरात आरोपीने पत्नीचा गळा दोन्ही हातांनी दाबला. त्यानंतर चाकू काढून तिच्या कमरेवर वार केला. आईवर हल्ला होत असल्याचे पाहून मुलगी मध्ये पडली असता तिच्यावरही चाकूने वार करण्यात आला. दोघींना जखमा झाल्या असून, पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुलीला माहेरी पाठवण्याचा हट्ट; जावयाने सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला
याचदरम्यान पुण्यातील मॉडेल कॉलनीत कौटुंबिक वादातून सासऱ्यावर जावयाने तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची दुसरी घटना समोर आली. दत्तात्रय भिमाजी विटकर (७०, रा. वडारवाडी) असे जखमी सासऱ्याचे नाव आहे.
विटकर यांची मुलगी कौटुंबिक वादामुळे सुमारे चार महिन्यांपूर्वी माहेरी आली होती. तिला पुन्हा सासरी नांदण्यासाठी पाठवावे, असा तगादा तिचा पती मधुकर हडकमोल (४५, रा. आमोदा, जळगाव) लावत होता. विटकर हे मॉडेल कॉलनीतील एका सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतात.
१२ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता मधुकर त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला. पत्नीला माहेरी पाठवल्याच्या मुद्द्यावरून त्याने सासऱ्याशी वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने तीक्ष्ण शस्त्राने विटकर यांच्यावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विटकर यांचा मुलगा शशिकांत यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मधुकर हडकमोलविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार करीत आहेत.