‘दैवी शक्ती’चा दावा, मांडीवर अल्पवयीन मुलगी अन् कानात मंत्र! पुण्यात ‘गुरुवर्या’वर POCSO; दुसऱ्या गुरूंचे पायधुणीचे VIDEOही चर्चेत

पुणे : पुण्यात श्रद्धा, अध्यात्म आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना चर्चेत आल्या आहेत. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या स्वप्नील लांडे याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार असल्याची माहिती आहे.
आरोपानुसार, स्वप्नील लांडे याने एका अल्पवयीन मुलीला मांडीवर घेऊन तिच्या कानात मंत्र फुंकला. त्यानंतर “तुला काही अडचण आली तर माझ्याकडे ये,” असे त्याने मुलीला सांगितल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित मुलीचे समुपदेशन करण्यात आले आहे. लांडे हा बिबवेवाडी परिसरात राहत असल्याची माहिती असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

श्रद्धा, भीती आणि कथित दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेतला जात होता का, याचा तपास आता पोलिस करत आहेत. आरोपीकडून यापूर्वी आणखी कोणाचे शोषण किंवा फसवणूक झाली आहे का, याचीही माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ एका घटनेपुरता मर्यादित राहणार की आणखी काही धक्कादायक बाबी समोर येणार, याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, दुसऱ्या अध्यात्मिक गुरूंचे व्हिडीओही चर्चेत
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील अध्यात्मिक गुरू उमेश तागुंदे यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या शिष्य-शिष्यांकडून त्यांचे पाय पाणी आणि दुधाने धुतले जात असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, पाय धुतल्यानंतर ते पाणी किंवा दूध शिष्यांकडून प्राशन केले जात असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक-दोन नव्हे, तर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आल्याने या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हा प्रकार अंधश्रद्धा पसरवणारा आहे का, असा सवाल उमेश तागुंदे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी भक्तांना आपले पाय धुऊन पाणी पिण्याचे कोणतेही आदेश आपण देत नसल्याचे सांगितले. भक्त स्वतःहून पाय धुऊन पाणी पितात, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, आपण स्वतःही आपल्या गुरूंचे पाय धुऊन पाणी पित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट भक्तांनी आपले पाय धुवू नयेत, यासाठी आपण त्यांना विरोध करतो, असा दावाही त्यांनी केला.
एका बाजूला अल्पवयीन मुलीच्या शोषणाचा गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला अध्यात्मिक गुरूंच्या पायधुणीचे व्हिडीओ यामुळे पुण्यात श्रद्धेच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे, यावर चर्चा रंगली आहे. मात्र, स्वप्नील लांडेवरील आरोपांचा अंतिम निष्कर्ष तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.