सुखबीर सिंग बादलांचा जीव वाचवणाऱ्या संतोष केंद्रेंना सलाम! बादल कुटुंबीयांनी पाया पडत मानले आभार, ५ लाखांचं बक्षीस जाहीर


नवी दिल्ली : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वाराबाहेर कृपाणने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोर जसपालसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या हल्ल्यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये (एसपीयू) कार्यरत असलेले निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. हल्लेखोर कृपाण घेऊन बादल यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच केंद्रे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला रोखले. यावेळी केंद्रे यांच्या हातालाही दुखापत झाली.

सुखबीर बादल आणि कुटुंब नांदेडमध्ये

सुखबीरसिंग बादल हे पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल आणि कुटुंबातील अन्य सदस्यांसह नांदेडमध्ये आले होते. मुख्य गुरुद्वारात बादल कुटुंबाकडून अखंड पाठ ठेवण्यात आला असून त्याची सुरुवात बुधवारी सायंकाळी झाली. शनिवारी या पाठाची समाप्ती होणार आहे.

गुरुवारी बादल हे दर्शनासाठी नांदेडजवळील ऐतिहासिक माता साहिब गुरुद्वारात गेले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास सहकुटुंब दर्शन घेऊन बाहेर येत असताना निहंगांच्या वेशातील एका व्यक्तीने त्यांच्यावर कृपाणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

संतोष केंद्रेंचं धाडस ठरलं निर्णायक

हल्लेखोर हातात कृपाण घेऊन पुढे येताना दिसताच निरीक्षक संतोष केंद्रे यांनी क्षणाचाही विलंब न करता बादल आणि हल्लेखोर यांच्यामध्ये स्वतःला उभे केले. त्यांनी हल्लेखोराला रोखत बादल यांना सुरक्षित केले.

या झटापटीत केंद्रे यांच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव झाला. मात्र, दुखापत झाल्यानंतरही त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांच्या या धाडसाचे नांदेडसह सर्वत्र कौतुक होत आहे.

बादल कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन मानले आभार

जखमी झाल्यानंतर निरीक्षक संतोष केंद्रे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि धाडस पाहून बादल कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

यावेळी कुटुंबीयांनी केंद्रे यांचे चरणस्पर्श करून त्यांच्या धाडसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रे यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती आहे.

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी हल्लेखोराला घटनास्थळीच ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपले नाव आणि इतर माहिती देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्याला पोलिस बंदोबस्तात मुदखेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोराचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असल्याची माहिती समोर आली असून तो नांदेड किंवा आसपासच्या परिसरातील नसावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अकाल तख्तकडून हल्ल्याचा निषेध

पवित्र गुरुद्वारात झालेल्या या हल्ल्याचा अकाल तख्तकडून निषेध करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे गुरुद्वाराचे पावित्र्य आणि शीख समाजाची प्रतिमा मलिन होते, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.

दरम्यान, सुखबीरसिंग बादल पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते अर्शदीपसिंग क्लेर यांनी दिली. या हल्ल्यामागील कारण आणि कटाचा सखोल तपास करण्याची मागणी पक्षातील काही नेत्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!