राज्यातील 1.80 कोटी मतदारांवर टांगती तलवार! अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही


पुणे : राज्यात मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया सुरू असताना सुमारे 1 कोटी 80 लाख मतदारांचे गणना अर्ज अद्याप जमा झालेले नाहीत. विहित मुदतीत अर्ज जमा न झाल्यास या मतदारांची नावे 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

चोक्कलिंगम यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतल्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मतदारांना आपली माहिती तपासण्याचे आवाहन केले. गणना अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट आहे.

मुंबईतील 30 लाख मतदारांवर टांगती तलवार

मुंबई शहर आणि उपनगरातील केवळ 63 टक्के मतदारांची माहिती डिजिटाईज झाली आहे. सुमारे 29 टक्के मतदारांचे गणना अर्ज अद्याप प्राप्त झालेले नाहीत, तर उर्वरित 7 टक्के माहितीवर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे 30 लाख मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.

मतदारांनी स्वतःहून वेबसाईटवर आपली माहिती तपासावी, तसेच राजकीय पक्षांनीही मतदारयादीची पडताळणी करावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे.

नाव वगळले गेले तर काय करायचं?

पात्र मतदाराचे नाव प्रारूप मतदारयादीत न आढळल्यास 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या कालावधीत फॉर्म 6 भरून नाव पुन्हा समाविष्ट करता येणार आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही याच कालावधीत अर्ज करता येईल. मतदारांच्या माहितीत काही बदल असल्यास फॉर्म 8 भरता येणार आहे.

पुण्यात 11 लाख नावे वगळण्याची प्रक्रिया

पुणे जिल्ह्यात दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या सुमारे 11 लाख मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मतदारांच्या अनुपस्थितीचे तीन वेळा पंचनामे करून त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!