“पप्पा, आईला जाळू नका…” मुलाच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष; बीडमध्ये पत्नीला पेटवणाऱ्या पतीविरोधात संतापाची लाट

बीड : बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात घडलेल्या एका क्रूर घटनेने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लहान मुलाच्या डोळ्यांसमोर घडला. आईला वाचवण्यासाठी मुलगा आक्रोश करत असताना आरोपीने कोणतीही दया न दाखवल्याचा आरोप आहे.
मृत महिला अनुष्का शिरसाट या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पती मिलिंद शिरसाट हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने घरात सतत वाद, मारहाण आणि मानसिक छळ सुरू होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या वादानंतर परिस्थिती टोकाला गेली आणि आरोपीने संतापाच्या भरात पत्नीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याचे सांगितले जात आहे.

गंभीर भाजलेल्या अनुष्का यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिस तपासाची दिशा बदलली.


या प्रकरणात मृत्यूपूर्वी दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात अनुष्का यांनी पतीकडून सातत्याने होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख केला. “तो मला आणि मुलालाही मारहाण करायचा. त्या दिवशी मुलगा ‘पप्पा, मम्मीला मारू नका’ म्हणून रडत होता, पण त्याने काहीच ऐकलं नाही,” असे त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली होती.
घटनेनंतर आरोपी मिलिंद शिरसाट फरार झाला होता. पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत अखेर त्याला बीडमधून अटक केली. सध्या त्याच्याविरोधात खून आणि कौटुंबिक हिंसाचारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
या घटनेने कौटुंबिक संशय आणि हिंसाचार किती भयावह रूप धारण करू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. एका संशयातून एका महिलेचा जीव गेला, तर दुसरीकडे आईला जळताना पाहणाऱ्या चिमुकल्याच्या आयुष्यावर कायमची जखम उमटली आहे. या प्रकरणामुळे बीडसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.