आता फक्त 99 रुपयांत पेन्शनची सुरुवात! जाणून घ्या केंद्राची भन्नाट योजना…

नवी दिल्ली : झोमॅटो, स्विगी, ब्लिंकइट आणि अर्बन कंपनीसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी केंद्राकडून महत्त्वाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीअंतर्गत (NPS) आता हे कामगार केवळ 99 रुपयांपासून निवृत्ती निधीची सुरुवात करू शकणार आहेत.
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) गिग वर्कर्ससाठी NPSची नवी चौकट जाहीर केली आहे. अनिश्चित उत्पन्न असलेल्या या कामगारांना भविष्यासाठी आर्थिक नियोजन करता यावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

99 रुपयांपासून सुरू करता येणार NPS
या मॉडेलमध्ये गिग वर्कर्सना किमान 99 रुपयांपासून योगदान सुरू करता येणार आहे. त्यानंतर आपल्या आर्थिक क्षमतेनुसार योगदानाची रक्कम वाढवण्याची मुभा असेल.


विशेष म्हणजे योगदानाची जबाबदारी केवळ कामगारावरच असणार नाही. काही परिस्थितींमध्ये प्लॅटफॉर्म आणि कामगार मिळून योगदान देऊ शकतात, तर प्लॅटफॉर्म एग्रीगेटर कामगाराच्या वतीने संपूर्ण योगदानही करू शकतो.
PFRDAने 29 ऑक्टोबर 2025 रोजीच्या परिपत्रकाद्वारे NPS ई-श्रमिक मॉडेल सुरू केले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेच्या कक्षेत आणणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
ऑनबोर्डिंग प्रक्रिया होणार सोपी
गिग वर्कर्सचे उत्पन्न आणि कामाचे स्वरूप लक्षात घेऊन ही व्यवस्था लवचिक ठेवण्यात आली आहे. NPS खाती उघडणाऱ्या ‘पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स’ संस्थांना थेट एग्रीगेटर्ससोबत करार करता येणार आहे.
त्यामुळे झोमॅटो, स्विगीसारख्या प्लॅटफॉर्मना त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्स आणि इतर सेवा देणाऱ्या कामगारांना NPSमध्ये सहभागी करून घेणे सोपे होणार आहे. खाते सुरू झाल्यानंतर कामगारांना PRAN (Permanent Retirement Account Number) मिळणार असून, त्याद्वारे त्यांच्या NPS खात्याचे व्यवस्थापन करता येईल.