महिनाभरात संसार उद्ध्वस्त! मोशी दुर्घटनेत पती गेला, मदतीच्या पैशांवरून वाद अन् तरुण आईचं टोकाचं पाऊल; दोन लेकींच्या डोक्यावरचं छत्र हरपलं


पुणे : मोशी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर ओढवलेलं दुःख आणखी गडद झालं आहे. महिनाभरापूर्वी कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या अपघातात कुटुंबाचा कर्ता पुरुष नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच आता त्यांची 23 वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुहेरी आघातामुळे मोशीतील बोराडे वस्तीत शोककळा पसरली असून चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन चिमुकल्या मुली अचानक आई-वडिलांविना झाल्या आहेत.

8 जुलै रोजी मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यात नागेश गायकवाड यांचाही समावेश होता. अपघातानंतर शासन, महापालिका आणि संबंधित कंपनीकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही मदत मिळाल्यानंतर कुटुंबात पैशांच्या वाटपावरून वाद सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की, नागेश यांच्या मृत्यूनंतर मिळालेल्या मदतीच्या रकमांवरून घरात सतत तणावाचे वातावरण होते. काही रक्कम नातेवाईकांनी ताब्यात घेतल्याचा आरोपही केला जात आहे. यामुळे आधीच पतीच्या निधनाने खचलेल्या सोनाली यांच्यावर मानसिक ताण वाढत गेला.

नागेश यांचे वडील आणि मोठा भाऊ टाटा मोटर्समध्ये काम करत असून सोनाली गृहिणी होत्या. दोन लहान मुलींची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र पतीच्या अकाली मृत्यूनंतर आयुष्याचा डोलारा सांभाळताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कुटुंबातील आर्थिक वाद, भविष्यातील अनिश्चितता आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नसल्याने नेमकं कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सर्व बाजूंनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, मोशी दुर्घटनेला एक महिना उलटूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याची भावना मृतांच्या नातेवाईकांमध्ये आहे. जाहीर केलेली सर्व मदत अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही, नोकरीची आश्वासने प्रलंबित आहेत आणि दुर्घटनेस जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोपही होत आहे.

एका महिन्यात पती-पत्नी दोघांचेही मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंब पूर्णपणे हादरले आहे. मात्र या संपूर्ण शोकांतिकेतील सर्वात वेदनादायी वास्तव म्हणजे दोन निष्पाप मुलींना आता आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय आयुष्याचा प्रवास करावा लागणार आहे. मोशी दुर्घटनेनंतर उघड झालेली ही दुसरी शोकांतिका प्रशासनाच्या पुनर्वसन यंत्रणा, आर्थिक मदतीचे व्यवस्थापन आणि अपघातग्रस्त कुटुंबांच्या मानसिक आधाराच्या प्रश्नांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!