‘वर्षा’च्या पाण्याच्या टाकीवरून सरकारला घेरणार? जरांगेंचा २९ ऑगस्टचा मास्टरप्लॅन; मुंबईत मराठ्यांना जमण्याचं आवाहन


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान दिलं आहे. सोलापूरच्या तांदुळवाडी येथे झालेल्या सभेत जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाजाने दाखल व्हावं, असं आवाहन केलं. एवढंच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावरच आंदोलन करण्याचा इशारा देत, गरज पडल्यास वर्षावरील पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण करणार, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

जरांगे म्हणाले की, २९ ऑगस्टला एकाही मराठ्याने घरी राहू नये. मुंबईत आल्यानंतर अनेक गोष्टी पाहायच्या असल्याचं सांगताना त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानाचाही उल्लेख केला. सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांवरून सरकारवर निशाणा साधताना जरांगे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी मराठा समाजातील अनेक आमदार आणि मंत्री सत्तेत गेले, मात्र समाजासाठी अपेक्षित भूमिका घेतली नसल्याचं म्हटलं. आपण आतापर्यंत संघर्ष केला, पण आता मराठ्यांना पुन्हा मोठा उठाव करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बावनकुळे यांनी केलेल्या कथित भूमिकेची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केल्याचा आरोप करत, मराठ्यांनीच सत्तेत बसवलं, पण आता सत्ताधारी समाजाला विसरले, अशी भूमिका त्यांनी मांडली. धनगर, शेतकरी, बंजारा आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर आरोप केले. विविध समाजांसाठी असलेल्या योजनांचा लाभ योग्य पद्धतीने मिळत नसल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी सरकारसोबत समन्वय साधल्यास प्रश्न चर्चेतून सोडवता येतील, असं दरेकर म्हणाले. कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा शिक्षण आणि नोकरीसाठी होता; राजकारणासाठी नव्हता, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी अनेक योजना आणण्यात आल्याचं सांगत, जरांगे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास सरकार तयार असल्याचं दरेकर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता २९ ऑगस्टला मुंबईत नेमकं काय घडणार, जरांगे यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळणार आणि ‘वर्षा’वरील आंदोलनाबाबत सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!