बीडमध्ये ‘कराड समर्थका’चा गोळीबार? वादातून थेट चार राऊंड फायर; बंदुकीच्या रील्सनेही वाढवली खळबळ

बीड : बीडमध्ये किरकोळ वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचा दावा केला जाणाऱ्या सफवान खानने दोन गटांतील वादानंतर गोळीबार केल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. सरोज खान आणि जरीफ खान यांच्या म्हणण्यानुसार, सफवान खान गाडीतून उतरला आणि त्यांच्या दिशेने तब्बल चार राऊंड फायर केले. या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी एका तरुणाने सफवान खानला फोन करून घटनास्थळी बोलावल्याचे सांगितले जाते. त्यानंतर परिस्थिती अचानक चिघळली आणि गोळीबार झाल्याचा आरोप आहे. पीडितांनी सफवान खानला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याने यापूर्वीही राडा केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे सफवान खानची समाजमाध्यमांवरील उपस्थितीही चर्चेत आली आहे. त्याच्या काही चित्रफितींमध्ये हातात बंदूक असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अवैध शस्त्रांसोबतच्या अशा चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही केला जात आहे. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात सफवान खान कराडचा फोटो हातात घेऊन सहभागी झाल्याचेही समोर आले होते. कराडसोबतचे त्याचे काही चित्रफितीही यापूर्वी चर्चेत आल्या आहेत.


मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होणार आहे. गोळीबारात नेमके किती राऊंड झाडले गेले, शस्त्राचा वापर कोणी केला, गोळीबारामागील कारण काय होते आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या चर्चेला आधीच उधाण आले असताना, या नव्या घटनेने पुन्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.