कर्जमाफीचा पैसा मिळाला, पण शेतकरी मयत असेल तर वारसांचं काय? सरकारचा मोठा दिलासा; ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा


पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून पहिल्या टप्प्यात हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 ऑगस्ट रोजी राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तब्बल 5 हजार 29 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली. मात्र, या योजनेत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांचा यापूर्वीच मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी या प्रश्नावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीच्या निकषांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या वारसालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी सर्वप्रथम संबंधित मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंदवणे आवश्यक आहे. ही नोंद झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया सेवा संस्था तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या स्तरावर पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे केवळ शेतकरी हयात नसल्यामुळे कर्जमाफीचा लाभ थांबणार नाही, मात्र वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

कर्जमाफीच्या लाभाबाबत काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास संबंधित कुटुंबीयांना तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकार विभागाशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे आणि महसुली नोंदी अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व आहे.

दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यांवरील थकीत रक्कम कर्जमाफीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली आहे. 7 ऑगस्ट रोजी वितरित करण्यात आलेल्या 5,029 कोटी रुपयांमुळे 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांची पात्र पीक कर्ज खाती निरंक झाली आहेत. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष प्रोत्साहनपर अनुदानाकडे लागले आहे. काही लाभार्थ्यांच्या बाबतीत तांत्रिक अडचणी, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा इतर कारणांमुळे पैसे जमा होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे नवीन अर्ज करण्याची गरज नसून ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेद्वारे पात्रता निश्चित केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तसेच पुढील प्रोत्साहनपर लाभाची रक्कम संबंधित खात्यात जमा केली जाणार आहे.

कर्जखाते निरंक झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. मात्र, मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी लाभासाठी महसुली दप्तरी वारस नोंद करून घेणे आणि संबंधित सेवा संस्था व बँकेकडील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पुढील टप्प्यातील प्रोत्साहनपर लाभ कधी आणि कोणत्या पद्धतीने वितरित केला जाणार, याकडे आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!