पुण्यातील CNG संकट चिघळलं; तोडग्यासाठी आता थेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे धाव


पुणे : पुणे शहर आणि परिसरात सीएनजीच्या कमी दाबामुळे आणि अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे निर्माण झालेले संकट अद्याप कायम आहे. या समस्येवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडून कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशन आता थेट केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्तक्षेपाची मागणी करणार आहे.

असोसिएशनने एमएनजीएलकडे अनेक वेळा लेखी निवेदने दिली, प्रत्यक्ष बैठका घेतल्या आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडे (पीएनजीआरबी) देखील पाठपुरावा केला. तसेच निश्चित कालमर्यादेसह कृती आराखडा सादर करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या मागणीवर अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या कमी गॅस दाबामुळे पुण्यातील अनेक सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून, पंपचालकांनाही आर्थिक फटका बसत आहे. ग्राहकांचा रोष सहन करावा लागत असतानाच, काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसांकडून सीएनजी पंपचालकांना नोटिसाही बजावण्यात आल्याने डीलर्समध्ये तीव्र नाराजी आहे.

याशिवाय, विद्यमान सीएनजी केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित डॉटर बूस्टर स्टेशन (डीबीएस) व्यवस्था किंवा इतर पर्यायी उपाययोजनांबाबत एमएनजीएलकडून कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा अंमलबजावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशनने केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची तातडीने भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसचा दाब पूर्ववत करणे, आवश्यक पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारणे, तात्पुरती गॅस पुरवठा व्यवस्था सुरू करणे आणि एमएनजीएलच्या त्रुटींमुळे सीएनजी पंपचालकांवर होणारी अन्यायकारक कारवाई थांबविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी संघटनेची मागणी आहे.

पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल म्हणाले, पुण्यातील लाखो नागरिकांना दररोज केवळ सीएनजी भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. गॅस पुरवठ्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नसतानाही पंपचालकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची जबाबदारीही आमच्यावर टाकली जात आहे. संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून पुणेकरांना दिलासा द्यावा.

दरम्यान, दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या या परिस्थितीमुळे पुण्यातील सीएनजी पुरवठा व्यवस्था अडचणीत आली असून, आता केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरच या प्रश्नावर ठोस तोडगा निघणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!